Maharashtra Mega Bharti 2026 Announced
Maharashtra Mega Bharti 2026 Update: राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक संकेत मिळाले असून, महाराष्ट्रात लवकरच ७० हजारांहून अधिक पदांसाठी मोठी भरती मोहीम सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी याबाबत अधिकृत माहिती देत सांगितले की, ही भरती नव्या आणि पारदर्शक पद्धतीने, टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. यामध्ये सुमारे २० हजार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरली जाणार असून, उर्वरित पदे विविध शासकीय विभागांमध्ये आयोगाबाहेरून भरण्यात येतील.
सेवा प्रवेश नियमावलीत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते. बैठकीत राज्य प्रशासनात सर्वांगीण सुधारणा जलदगतीने राबवण्यावर विशेष भर देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मनुष्यबळ व्यवस्थापन मजबूत करणे आणि भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भरती करताना केवळ रिक्त पदे भरण्यावर भर न देता, संबंधित पदासाठी आवश्यक कौशल्य, पात्रता, सेवा प्रवेश नियम आणि कामाचे स्वरूप यांचा सखोल विचार केला जाईल, असे निर्देशही त्यांनी दिले.
“सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नसून, राज्य शासनाच्या संपूर्ण भरती व्यवस्थेचा कणा आहे,” असे सांगत, ७० हजार पदे भरल्यानंतर प्रशासनाची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल आणि नागरिकांना सेवा अधिक वेगाने व दर्जेदार स्वरूपात मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
⇒Click Here For Free Police Bharti Online Test Paper

भरती प्रक्रियेत युवकांच्या मनात कोणताही संशय निर्माण होऊ नये, यासाठी ऑनलाईन व डिजिटल पडताळणी प्रणाली अधिक प्रभावीपणे वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी तंत्रज्ञानाधारित प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. पासपोर्टसारख्या संवेदनशील कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी शक्य असेल, तर इतर भरती प्रक्रियांमध्येही तेच मॉडेल राबवता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Maharashtra Mega Bharti 2026 Update
🔹 महाराष्ट्रात ७० हजारांहून अधिक शासकीय पदांची भरती लवकरच
🔹 २० हजार पदे MPSC मार्फत भरण्यात येणार
🔹 भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने व नव्या पद्धतीने
🔹 डिजिटल व ऑनलाईन पडताळणी प्रणाली लागू होणार
🔹 डिजिलॉकर व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर
🔹 भरतीत पारदर्शकता व वेगाला प्राधान्य
🔹 युवकांच्या मनातील संशय दूर करण्यावर सरकारचा भर
🔹 ७० हजार पदांमुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढणार
🔹 नागरिकांना सेवा अधिक जलद व दर्जेदार मिळणार
यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच डिजिलॉकरमध्ये प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेत कोणताही पक्षपात, अन्याय किंवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण यंत्रणा स्वच्छ, विश्वासार्ह आणि वेगवान असणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेलचा उल्लेख केला. हे मॉडेल देशात सर्वाधिक प्रशंसनीय ठरले असून, इतर राज्यांनीही ते स्वीकारावे, असे पंतप्रधानांनी सूचित केल्याची माहिती त्यांनी दिली.
पुढील एका वर्षात महाराष्ट्रात ‘गव्हर्नन्स रिफॉर्म’चे नवे मॉडेल उभे राहील, असा विश्वास व्यक्त करत, प्रत्येक विभागाने एकत्रितपणे काम करून प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या निर्णयांमुळे राज्यातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, शासनाच्या कार्यपद्धतीतही सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.